ओव्हर द टॉप
जरा ओव्हर द टॉप वाटतंय
अस एका वाक्यात
एक केलेल्या दिवस-रात्रींचे
अस्तित्व तू नाकारलेस
तेंव्हा मी गप्प राहिलो
काही दु:ख असतातच तशी
थोडीशी ‘ओव्हर द टॉप’
आणि ते बरेच आहे
उतरली खाली जर ती तर
जातील थेट काळजाच्या आरपार
काही दु:ख नसतात
उच्चब्रू, शालीन वगैरे
नियम पाळणारी, सुसंस्कृतपणाचे
चाकोरीत रहाणारी
काही दु:ख असतात हेकेखोर
बलप्रदर्शन करणारी, उगीचच
कुठेही कपडे काढून आपले
निरागस नग्नत्व मिरवणारी
त्या दु:खांच्या कथा
शब्दांनाच पागळे करतात
पाळमूळं उखडतात
सर्जनशीलतेच्या संकेतांची
ती तर असतातच मस्तवाल
पण बनवतात आम्हालाही
मस्तवाल, काही क्षण
त्या निसटत्या सोबतीचे
व्यावसायिक तटस्थता जपणाऱ्या
तुझ्यासारख्या टिकेकराला
दिसतो फक्त तो वेश, तो आवेश
पण तो वेश असतो त्या नग्नतेला
थोड़ स्वीकार्य बनवण्यासाठी
तुझ्या ‘सुसंस्कृत’ समाजासाठी
तू पण फसतोस त्या दिखाव्याला
आणि अस्सल गावरान दुःखाला
सुटाबुटातला साहेब समजून तोलतोस
त्त्याच कर्जाने आणलेल्या मापदंडाने
म्हणूनच मी गप्प राहतो
कारण तुझ्या कर्जाऊ मापदंडाचे हप्ते
तुला असेंच तर फेडावे लागणार
मी मात्र त्या मापदंडाप्रमाणे
त्या दु:खांना कुठे बांधू?
त्यांना जाउदे ‘ओव्हर द टॉप’
मी थोडा छोटा झालोच त्यामध्ये
तर होउदे
ती दु:खं तरी मोठी होतील
आणि मी पण मोठा झालोच आहेकी
त्यांचा व्यवसाय करत
माझा मोठेपणाही कर्जाउच आहे ना?